BANNER

The Janshakti News

सोनं घ्या, सोनं... विजयादशमी दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात ? जाणून घ्या पौराणिक कथा,
आज मंगळवार! विजयादशमी दसऱ्याचा सण आहे. नवरात्र संपले… आता दसरा उजाडला. विजयादशमी दसरा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त आहे. या दिवशी शुभकार्याला सुरुवात करतात. सोने खरेदी करण्याचीही प्रथा आहे…

                           पौराणिक कथा  

दुर्गासुर राक्षसाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घेतले. ‘मला त्रैलोक्याचे राज्य मिळावे’ असा वरही त्याने ब्रह्मदेवाकडून मिळवला तसेच ‘पुरुषाचे हातून मृत्यू देणार नाही’ असाही वर मिळवला. दुर्गासुर हे दोन वर मिळताच सर्वांना त्रास देऊ लागला. शेवटी त्याने इंद्राविरुद्ध लढाई पुकारली; परंतु शुक्राचार्य याचा सेनापती असल्याने तो मेलेल्यांनाही संजीवनी विद्येच्या जोरावर जिवंत करी. दुर्गासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवले. इंद्राचाही त्याने पराभव केला आणि नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जिंकण्यासाठी त्याने आपला मोर्चा वळावला. सर्वच घाबरले. दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मृत्यू येणार नव्हता. शेवटी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना करण्यात आली. ‘विजया’ हे नाव धारण करून ती शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. महादक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी ५६ कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिलेमा, दुर्धर, दुर्मुख, बिडाळ यांच्यासारख्या बलाढ्य राक्षसाला तिने ठार मारले. त्यामुळे ताळजंव राक्षस संतापला. त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला. विजयादेवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. शेवटी घनघोर लढाई करून विजयादेवीने विजय मिळवला. ही लढाई नऊ दिवस चालली होती. दहाव्या दिवशी जय मिळाल्याने विजयादशमीच्या स्मरणार्थ या दिवसाला ‘विजयादशमी’ हे नाव मिळाले.

प्रभू रामचंद्रानी रावणाला अश्विन शुक्ल दशमीच्याच दिवशीच ठार मारले म्हणून दसरा साजरा केला जातो. रावणाची दहा शिरे तुटून जमिनीवर पडली म्हणून या दिवसाला ‘दशहरा दसरा’ असे म्हणतात. एकदा पार्वतीने शंकराला विचारले की ‘देवाधिदेव लोकांच्यात
विजयादशमीचा सण प्रचलित आहे. हा सण साजरा केल्याने कोणते फळ मिळते?’

भगवान शंकर म्हणाले, ‘देवी, अश्विन शुक्ल दशमीच्या दिवशी नक्षत्रांच्या उदयाच्या वेळी विजय नावाचा मुहूर्त असतो. या वेळी इच्छा केलेली आणि कार्यारंभ केलेली सर्व कार्ये सिद्धीस जातात. म्हणूनच या दिवशी लोक शुभकार्याचा संकल्प आणि प्रारंभ करतात.

या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारले. रजपूत लोक या दिवशी मोहिमांना प्रारंभ करून मोहिमा यशस्वी करीत असत. अर्जुन | अज्ञातवासात असताना त्याने आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. ती त्याने दसऱ्याच्या दिवशी काढून घेतली. विराटाच्या गाई पळवणाऱ्या कौरव सैन्यावर स्वारी करून त्याने विजय मिळवला. विजयादशमी हा लष्करी सण आहे. शौर्य, संपत्ती आणि विद्या देणाऱ्या श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वतीच्या वरदानाचे प्रतीक म्हणून या दिवसाला मोठे महत्त्व मिळाले आहे. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, शस्त्रपूजन आणि अपराजिता पूजा हे चार महत्त्वाचे विधी सांगितले आहेत. या दिवशी सैन्य लढाईसाठी गावाची सीमा ओलांडून आहेर पडत असे. वाटेत शमी वृक्षाची पूजा केली जाई.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆