ईश्वरपूर दि. ०४ : पत्नीला दोन मुली झाल्या, मुलगा झाला नाही, या रागातून पत्नीचा खून करून अपघाताचा बनाव केल्याच्या प्रकरणात आरोपी कोस्तुभ कृष्णराव सरनौबत याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याशिवाय भारतीय दंड विधानाच्या कलम १७७ अन्वये सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाची माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार, आरोपी कोस्तुभ कृष्णराव सरनौबत याला दोन मुली झाल्या होत्या. मुलगा झाला नाही, या रागातून त्याने पत्नीला फिरायला जाण्याच्या बहाण्याने घेऊन जात विहिरीत ढकलून तिचा खून केला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपघात झाल्याचा बनाव करून खोटी तक्रार नोंदवल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी फिर्यादी मिलिंद नानासो भोसले, वय २८ वर्षे, रा. न्यू पॅलेस हेड पोस्ट ऑफिसजवळ, रमण मळा, कोल्हापूर यांनी १८ सप्टेंबर २०२२ रोजी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
तपासाअंती आरोपपत्र दाखल
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पूर्ण केला. तपासात आरोपीविरुद्ध पुरावे प्राप्त झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर प्रकरणाची सुनावणी सेशन केस क्रमांक १२७/२०२२ अन्वये मा. सत्र न्यायाधीश क्र. २, मा. आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात सुरू होती.
न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
प्रसिद्धीपत्रकानुसार, न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये आरोपी कौस्तुभ कृष्णराव सरनौबत याला जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, तसेच कलम ३७७ अन्वये सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी मिलिंद नानासो सावंत भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एन. राऊत आणि तपासी अंमलदार शशिकांत चव्हाण यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. विशाल नरेंद्र बामणे यांनी काम पाहिले.
पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली तपास व न्यायालयीन कामकाज
या प्रकरणाच्या कामकाजात पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पत्नीच्या खून प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे गुन्हेगारी प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



