सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : सांगली शहराच्या हद्दीपर्यंत पिण्याचे पाणी वेळेत पोहोचेपर्यंत कृष्णा नदीवरील टेंभू बॅरेजच्या खालील बाजूस ते को. पं. बंधारा सांगली उजवा व डावा तीर क्षेत्रामध्ये नदीमधून शेतीसाठी होणारा खासगी पाणी उपसा तसेच औद्योगिक कारणांसाठी होणारा बिगर सिंचन पाणी उपसा दि. 16 व 17 ऑक्टोबर 2026 या दोन दिवसांच्या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश सांगली पाटबंधारे विभागाने दिले आहेत. या आदेशातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजना वगळण्यात आल्या असून, त्या सुरू राहतील.
महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, 1976 मधील कलम 11, 49 मधील तरतुदींनुसार कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांच्या आदेशानुसार ही उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने आणि कृष्णा नदीतील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता सांगली शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या दि. 5 ऑक्टोबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार, यावर्षी एल-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धरणे, जलाशय आणि अन्य जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पिण्याच्या पाण्याच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने उपसाबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपसाबंदीच्या कालावधीत अनधिकृतरीत्या पाणी उपसा करताना आढळल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करण्यात येईल. तसेच, परवानाधारकाचा पाणी उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल. या कालावधीत पाणी उपशामुळे होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, 1976 मधील कलम 51 (3) व 97 मधील तरतुदींनुसार हे आदेश देण्यात आले आहेत.
कृष्णा नदीतील मर्यादित पाणीसाठ्याचा विचार करता बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी अथवा औद्योगिक वापरातील पाणी नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाने केले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


