yuva MAharashtra सांगलीत बांधकाम कामगार संघटना आक्रमक ; ८ नोव्हेंबरला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा!

सांगलीत बांधकाम कामगार संघटना आक्रमक ; ८ नोव्हेंबरला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा!


कल्याणकारी योजनांसह शिष्यवृत्ती, नवीन नोंदणी व प्रलंबित क्लेम तातडीने निकाली काढण्याची मागणी ; अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संघटनेची नाराजी



                           व्हिडीओ 


            अशोकराव वायदंडे यांची प्रतिक्रिया 


सांगली | प्रतिनिधी   ३१ आक्टोबर २०२६

सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून डी. पी. आय. असंघटित बांधकाम कामगार संघटना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सांगली येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन शासन व प्रशासनाला देण्यात आले आहे.

भेट नाकारल्याचा संघटनेचा आरोप

डी. पी. आय. असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे प्रमुख पदाधिकारी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध प्रलंबित प्रश्नांवर निवेदन देण्यासाठी सांगली जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात गेले होते. मात्र, सकाळी ११ वाजल्यापासून तब्बल दोन तास ताटकळत बसवूनही सहाय्यक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांनी भेट नाकारल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

दुपारी ३ वाजता पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला असतानाही भेट मिळाली नाही. फोन केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 'सॉफ्टवेअर बंद आहे', 'व्ही.सी. मिटिंग सुरू आहे', अशी कारणे देऊन टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवरून संताप

गेल्या जवळपास वर्षभरापासून बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांचे कामकाज ठप्प असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे कामगारांना शासकीय योजनांच्या लाभासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संघटनेने प्रामुख्याने पुढील मागण्या केल्या आहेत.

बांधकाम कामगारांचे ऑनलाइन पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू करावे.

प्रलंबित नवीन नोंदणी व नूतनीकरणाचे अर्ज तातडीने निकाली काढावेत.

बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचे प्रस्ताव मंजूर करावेत.

मयत कामगारांच्या वारसांचे प्रलंबित दावे निकाली काढावेत.

प्रसूती लाभ, विवाह सहाय्य व इतर प्रलंबित क्लेमवर तातडीने कार्यवाही करावी.

प्रलंबित ऑनलाइन नोंदणी व लाभ वितरण प्रक्रियेला गती द्यावी.

या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संघटना वारंवार प्रयत्न करत असतानाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी; आंदोलनाचा इशारा

सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कथित मनमानी व वेळकाढू कार्यपद्धतीची खातेनिहाय चौकशी करून नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

८ नोव्हेंबर २०२६ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सांगली येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा डी. पी. आय. असंघटित बांधकाम कामगार संघटनेने दिला आहे. कामगारांच्या प्रश्नांची शासन व प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासनावर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अशोक वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. सतीश लोंढे, सांगली जिल्हाध्यक्ष श्री. दादासाहेब कस्तुरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, सांगली यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.


"या प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांची अधिकृत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी फोन रिसीव्ह न केल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल." संपादक, द जनशक्ती न्यूज

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰