सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी सन 2026-27 या कालावधीसाठी आपला हयातीचा दाखला (Life Certificate) दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनाचे नियमित वितरण सुरू राहण्यासाठी सर्व संबंधितांनी विहित मुदतीत हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन कोषागार अधिकारी रेणुका पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनी त्यांचे हयातीचे दाखले प्रतिवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे. या दाखल्यांच्या आधारे निवृत्तीवेतनधारकांचे पुढील निवृत्तीवेतन अदा करणे कोषागार कार्यालयास शक्य होते.
पुढीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येईल – (१) आपले निवृत्तीवेतनधारक खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जावून बँक अधिकाऱ्याच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. (२) https://jeevanpramaan.gov.in (जीवनप्रमाण) या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन पध्दतीने हयात दाखला सादर करता येईल. (३) हयातीच्या प्रमाणपत्रावर बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करून जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येईल. (४) निवृत्तीवेतनधारक काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदूतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येईल. (५) भारतीय डाकविभागाकडून India Post Payment Bank (IPPB) च्या माध्यमातून डिजीटल हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची सुविधा सशुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (६) Android Smartphone / iOS Mobile Phone वर Jeevan Pramaan Application डाऊनलोड करुन ऑनलाइन पध्दतीने हयात दाखला सादर करता येईल.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


